बुधवार, २१ सप्टेंबर, २०११

माझ्या आठवणीतील दसरा...


आताच गणपती उत्सव खूप उत्साहात पार पडला आणि वेध लागले ते दसऱ्या आणि दिवाळीचे...
मित्रानो आपण जेव्हा लहान असतो तेव्हाचे दिवस काही वेगळेच असतात नाही..
अजूनही ते दसऱ्या दिवाळीचे क्षण माझ्या मनाच्या कोपऱ्यात जतन आहेत.
खरतर ते प्रत्येकाच्या मनात असतात.पण मोठे झाल्यावर जी काही जबाबदारी येते प्रत्येकावर त्या मध्ये कुठे तरी आपण हे सगळ हरवून बसतो.
राहतात त्या फक्त आणि फक्त आठवणी...

मला आठवतंय दसऱ्याची सुरवात घरी घटस्थापनेने व्हायची.
सकाळी सकाळी बाबा शेतात जाऊन भुसभुशीत काळी माती आणायचे,या मातीला स्थानिक भाषेत "वावरी" म्हणतात. 
आईची एकच धावपळ सुरु असायची,संध्याकाळी घटाची स्थापना करण्यासाठी ती वेगवेगळी कडधान्य गोळा करण्याच्या कामात गुंग होऊन जायची.
कुंभार आदल्या दिवशीच मातीचा तयार केलेला घट घरी देऊन गेलेला असायचा.गावच्या मारुतीच्या देवळातील गुरव पिंपळाच्या पानाची पत्रावळी घेऊन यायचा.
घटस्थापनेच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त झाला कि घरातील सगळे मिळून घटस्थापना करायचो.
ते क्षण काही औरच होते दोस्तानो..Those are some of the magical moments in my life...

आजोबा देवघरात देवासमोर एका ताटामध्ये पत्रावळी ठेऊन त्यावर शेतातून आणलेली माती आणि कडधान्ये एकत्र करून त्याचा शीग लावायचे.
आणि त्यावर घट ठेऊन घटावर खाऊची पाने आणि त्यावर नारळाची मांडणी व्हायची. मातीवर थोडे पाणी शिंपडून हे सगळे देवा समोर ठेवायचे.
पहिल्या दिवशी या घटावर खाऊच्या पानांची माळ करून सोडायची. माळेतील पानांची संख्या पण ठरलेली.. सात..
आणि माळ करताना सुई दोरा वापरला जाणार नाही यावर कटाक्ष असायचा. 
दोऱ्यामध्ये पानांचा देठ पकडून गाठ मारायची कि झाली माळ तयार.
या घटा समोर आई दिवा लावायची. आता पुढील आठ दिवस तो दिवा विझणार नाही किंवा त्या मधील तेल संपणार नाही याची जबाबदारी आईची आणि आमची असायची. 

आम्ही बच्चेमंडळी जाता येता उत्सुकतेने तिकडे पाहायचो. किती तृण उगवले हे पाहायला आम्ही जायचो आणि बरोबर आईच्या तावडीत सापडायचो. 
आई म्हणायची " अरे सारखे पाहू नका बाळानो... ते तृण लाजतील ना... तुम्ही जर सारखे पहिले त्यांना तर मग नाही उगवणार ते "
आम्ही होहो म्हणायचो, हसायचो आणि धूम ठोकायचो.पण सारखे लक्ष्य तिकडेच असायचे.
अखेर चौथ्या पाचव्या दिवशी छोटे छोटे कोंब मातीच्या पोटातून बाहेर पडायला लागायचे. ते सगळे आमच्यासाठी खूपच आनंददायी आणि आश्चर्यकारक  होते.
काय कुणास ठाऊक माहित नाही आता वाटते कि, किती निरागस विचार होते ते. छोट्या छोट्या गोष्टी मधील आनंद सुद्धा इतका मोठा होता कि बस...

दररोज शाळेतून घरी येताना वेगवेगळी फुले घरी आणायची आणि त्या फुलांची माळ करून घटावर घालण्यासाठी.आम्ही फुले आईला आणून द्यायचो, आई त्यांची सुंदर माळ तयार करायची.ती माळ घटावर घातली की अगरबत्ती लाऊन देवा पुढे आम्ही भावंडे शुभंकरोती म्हणायचो.दारातल्या तुळशी समोर दिवा लावायचा. सगळे घर त्या अगरबत्तीच्या सुगंधाने भरून जायचे. या नऊ दिवसात एक अनामिक नवचैतन्याने संपूर्ण घर भारलेले असायचे.

पाहतापाहता आठ दिवस भुर्रकन निघून जायचे आणि मातीच्या पोटातून बाहेर आलेले छोटे छोटे तृण मोठे व्हायचे. आठव्या दिवशी अक्षरश: घट आणि नारळ या छोट्या रोपांनी झाकून जायचा.ते पहिल्या वर जो उल्हास मनात असायचा तो नेमका आता मला शब्दात सांगता पण येणार नाही.दसऱ्याच्या आदल्या दिवशी घरी खंडेनवमीची पूजा व्हायची.घरात असतील नसतील तितकी अवजारे शोधून साफसूफ करून त्यासगळ्यांची पूजा करण्यात सकाळ निघून जायची.सगळी अवजारे देव्हाऱ्याजवळ मांडून त्यांना गंध, गुलाल, बुक्का लावायचा आणि फुले वाहून त्यांची पूजा करायची.दुसऱ्या दिवशी दसरा...सिमोलंघन...

आई मस्त गोड कडाकणी करायची. सात कडाकन्यांची माळ घटावर बांधून दसऱ्याची पूजा सर्वजणांनी मिळून करायची.गल्लीतल्या छोट्या छोट्या मित्रांना एकत्र करून सगळ्यांनी मिळून घाटावरील तृण तोडून देवाला वाहायचे.हे करताना हातात निरांजनाचे ताट आणि तोंडात "जोतिबाच्या नावाने चांगभले"चा जयघोष असायचा.सगळ्यांना कडाकणी,पान-सुपारी आणि घटावरील नारळाचे खोबरे प्रसाद म्हणून द्यायचे.घटावरील तोडलेले तृण डोक्यावरील टोपीत खोऊन दिवसभर इकडून तिकडे मिरवण्यात एक वेगळीच मज्जा वाटायची.दुपारी आईच्या हातच्या अप्रतिम पुरणपोळीवर मनसोक्त ताव मारला जायचा.

संध्याकाळी आपट्याच्या पानाचे सोने वाटप कार्यक्रम ठरलेला. त्या अगोदर शेतात जाऊन ऊस आणि आंब्याची पाने आणून घराला तोरणाची सजावट झालेली असायची.पहिल्यांदा गावातल्या देवांना सोने वाहायचे आणि नंतर घरातील देवांना.त्यानंतर घरातील सगळ्या छोट्या मोठ्या मंडळीना आपट्याची पाने सोन्याच्या रुपात देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे.In that childhood time, this all was simply amazing for me...
 आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा या बाल आठवणीनी मन कातर होऊन जाते.आताच्या या नेहमीच्या रामरगाड्यात त्या सगळ्या जगलेल्या गोष्टी-क्षण कुठे तरी दूर राहून गेल्या.शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी साठी पुणे गाठावे लागले आणि हळूहळू एक एक गोष्ट हातातून निसटून जात राहिली आणि त्याच्या आठवणी होत गेल्या.माहित नाही, परत केव्हा या आठवणी जगता येतील? आता दसऱ्यातील एखादा दिवस गावी जाणे होते.बाकी सगळ्या रूढी परंपरा तश्याच नित्य नियमाने सुरु आहेत पण त्यासगळ्या मध्ये माझी उपस्थिती मात्र हरवली आहे.

जे क्षण मी लहानपणी जगले त्याच्या आता आठवणी झाल्या. आता दसरा दिवाळी जवळ येऊ लागली कि हे सगळे आठवते आणि मन निराश होऊन जाते.माहित नाही या आठवणी परत कधी जगायला मिळतील का? एक वेळ विचार येतो..का आपण मोठे झालो? तसेच छोटे राहिलो असतो तर किती बरे झाले असते..त्या माणसात,त्या मातीत,त्या विश्वात राहण्याचा, जगण्याचा आनंद काही औरच होता...

 माझ्या मनाच्या कप्यातील या काही सुखद आठवणी माझ्या पहिल्या ब्लॉगच्या रुपात इथे लिहताना फारच आनंद होत आहे.या सगळ्या आठवणीना उजाळा देता आला यातच ते क्षण पुन्हा जगता आल्याचे समाधान मनात भरून राहिले आहे हेमात्र नक्की....   
                                                                                                       
                                                                                  - मेघमल्हार... 

३ टिप्पण्या: